Tourist Attractions

   
बाणकोट
  

हिंमतगड

रत्नागिरी जिल्हयातील उत्तरेकडचे शेवटचे टोक म्हणजे बाणकोट.

प्लिनी या ग्रीक तज्ज्ञांने मंदगोर किंवा मंदारगिरी या नावाने इसवी सनाच्या पहिल्या शतकात बाणकोटचा उल्लेख केला आहे. येथे सावित्री नदीच्या दक्षीण तीरावर खाडीच्या मुखाशी टेकडीवर बाणकोटचा किल्ला आहे. विजापूरकरांपासून 1548 मध्ये हा किल्ला पोर्तुगिजांकडे व नंतर 16 व्या शतकाच्या मध्यात मराठयांकडे आला. ब्रिटीशांच्या काळातही जलवाहतुकीच्या दृष्टीने बाणकोट किल्ला व खाडीचे महत्त्व होते. मराठयांच्या ताब्यात असलेला हा हिंमतगड कमोडोर जेम्स याने जिंकला आणि त्याला फोर्ट व्हिक्टोरीया असे नाव दिले.

किल्लयावर जायच्या चढणीच्या रस्त्यावरच बाणकोट गाव लागते. या गावात चहा-पाणी/नाष्टा याची सोय नाही. गावात फक्त एक विहीर आहे. त्यामुळे हा सर्व बंदाबस्त करून मग किल्ल्यात जावे लागते.

बाणकोट गावातून थेट किल्ल्यांपर्यंत जाणारा डांबरीमोटार रस्ता आहे. किल्ल्याजवळ पोहोचण्या-या जमिनीच्या बाजूला तटबंदीलगत खंदक खणलेला आहे. परंतु काही ठिकाणी दगड-धोंडे, माती, झाडेझुडपे यांनी तो आता बुजला आहे. साधारण चौकोनी आकाराच्या या किल्ल्याचे पश्चिम दिशेस समुद्राच्या बाजूला उत्तराभिमुख्स प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. नदीच्या पलीकडच्या तीरावर छोटयाशा सुरूच्या बनामागे दिसणारा महादेवाच्या पिंडीच्या बाकाराचा डोंगर म्हणजे हरितेश्र्वर. बाणकोटच्या अलीकडे वेशवी नावाचे गाव आहे. या गावातही एक 500 वर्षे जुनी मशीद असून ती अजूनही वापरात आहे. परंतु तेथे आत प्रवेश मिळत नाही. तेथून लाँचने बागमांडले किंवा कोलमांडले येथे जाता येते. येथून हरिहरेश्र्वर फक्त 4 कि.मी. अंतरावर आहे.

प्रवेशद्वारातून आत शिरले की ज्या उजव्या व डाव्या बाजूस पहारेक-यांच्या खोल्या आहेत. पुढे गेल्यावर नगारखान्यावर जाण्यासाठी डाव्या हाताला दगडी जिना आहे. उजव्या कोप-यात एक भूयार व तळघर आहे. या शिवाय तटावर जाण्यासाठी दोन जिने आहेत. आतील इमारतींची फक्त जोतीचे शिल्लक आहेत. आतमध्ये आंबा आणि इतर मोठमोठी झाडे आहेत.

दक्षिणेकडील बुरूजातून बाहेर पडण्यासाठी एक दिंडी म्हणजे छोटा दरवाजा बाहे. त्यातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला उतारावर खालच्या बाजूस दिसणारी स्मारके म्हणजे त्यावेळची ब्रिटिश दफनभूमी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर पाणबुरूज दिसतो.

सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा जागी असलेल्या ह्या किल्ल्यावरून हर्णे-मुरूडपासून हरिहरेश्र्वर-श्रीवर्धनपर्यंतचा परिसर न्याहाळता येतो. हर्णे-बंदरातील मच्छीमार बोटी, खोल समुद्रात क्वचित अतिप्रचंड जहाजेही दृष्टीस पडतात.

इ.स. 1800 च्या सुमारास मुंबईहून समुद्रमार्गे महाबळेश्वरला जाण्यासाठी बाणकोट व तेथून सावित्री नदीच्या खाडीतून जावे लागे. या मार्गाने आर्थर मॅलेट मुंबईहून महाबळेश्र्वरला जायला निघाला. त्यावेळी त्याची 25 वर्षांची पत्नी सोफीया व अवघ्या 32 दिवसांची मुलगी एलेन व्हॅरिएट यांना घेऊन जाणारी बोट 13 खलांशांसह बाणकोट खाडीत बुडाली. याच किल्ल्याच्या दफनभूमित त्यांचे स्मारक, मॅलेट मेमोरियल आजही आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तेथे दगडी चौथरा व त्यावर दगडी स्तंभ उभारलेला असून त्यावर त्यांची नावे कोरलेली होती.

या दु:खद प्रसंगानंतर महाबळेश्वरला गेलेला आर्थर मॅलेट सावित्री नदीच्या उगमापाशी उंच कडयावर जाऊन, आपली प्रिय पत्नी व मुलगी याच नदीच्या दुस-या टोकाशी चिरविश्रांती घेत आहेत या भावनेने एकांती बसत असे. तोच आजचा महाबळेश्वरचा सुप्रसिध्द पाँईंट आर्थर सीट.

पाणबुरूज

बाणकोट किल्ल्यावरून खाली उतरून मुख्य रस्त्याला लागल्यांनतर वेळासकडे जाताना उजव्या हाताला एक छोट बुरूजासारखे पडके बांधकाम दिसते. याला बुरूज म्हणतात. पूर्वीच्या काळी येणारे मचवे, पडाव, होडया येथेच लागत असत 

 

      © Ketki Beach Resort. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions