Tourist Attractions

   
दापोली
  

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषिविद्यापीठ

दापोलीच्या मुख्य रस्त्यावरून हर्णे-मुरूडकडे हर्णे-मुरूडकडे जाताना बुरोंडी पोलिस नाक्यापाशी डावीकडे वळून पाच मिनिटात आपण कोकण कृषिविद्यापिठाच्या भव्य कमानीच्या प्रवेशद्वरापाशी पाहोचतो. सरळ रस्त्याने आत गेल्यावर उजवीकडे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या कार्यालयाची इमारत आहे.
कोकण भागातील कृषिशिक्षण, संशोधन व विस्तारशिक्षण यासाठी 18 मे, 1972 रोजी मुंबईसह ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्हयांचा कार्यक्षेत्रासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषिविद्यापिठाची स्थापना दापोली येथे करण्यात आली. विद्यापीठातील प्रामुख्याने कृषिविद्याशाखा, कृषिअभियांत्रिकी, मत्स्यविद्याशाखा या तीन शाखा असून विविध विषयांवर अनेक संशोधन प्रकल्प व कृषितंत्रज्ञान प्रकल्प कार्यान्वित आहेत. फलोत्पादन हे कोकणचे अत्यंत महत्वाचे वैशिष्टये आहे.हे लक्षात घेऊन विद्यापिठाने आंब्याच्या रत्ना, सिंधू व कोकण रूची या महत्त्वपूर्ण जाती विकसित केल्या आहेत. तसेच काजू, कोकम, नारळ, चिकू, करवंद यांबरोबरच कंदपिके, जायफळ, काळीमिरी, दालचिनी, लवंग यांसारख्या मसाला पिकांच्या निरनिराळया जाती व त्यांच्या लागवड व वृध्दीसाठीच्या पध्दती विकसित केल्या आहेत.

याशिवाय भात, नागली, चवळी, कुळीथ, वाल, भाजीपाला पिके , वनशेती, चरक वनौषधी संग्रह यावर संशोधन व नवनवीन जातींची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. कोकणातील भूप्रदेश व शेतीपध्दतीचा विचार करून उपयुक्त ठरतील अशी अनेक शेती अवजारेही विद्यापिठाने विकसित केली आहेत. ती शेतक-यांना वरदानच ठरली आहेत. फळे आणि भाजीपाला यांच्या काढणीनंतरचे व्यवस्थापन व प्रक्रिया यावर विशेष याेजना कार्यान्वित आहे.
मत्स्यशेतीला असलेले महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्रातील एकमेव मत्स्यमाविद्यालय शिरगांव, ता. जि. रत्नागिरी येथे स्थापन करण्यात आले आहे. तसेच मत्स्य संशोधन-केंद्रे मुंबई व रत्नागिरी येथे स्थापन केले आहे.

विद्यापीठाचे शिक्षण व संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विस्तार शिक्ष्ण संचालनालय स्थापन केले असून कृषी, अभियांत्रिकी आणि मत्स्य या तीनही विद्याशाखांद्वारे हे प्रसारकार्य चालते. यात शेतकरी प्रशिक्षण वर्ग, मेळावे, प्रदर्शन, सहली, प्रात्यक्षिके, गटचर्चा, माहितीपट अशा विविध मोहिमांद्वारे सुधारीत कृषितंत्रज्ञान व संशोधनाचे फायदे शेतक-यांपर्यंत परिणामकारकतेने पोहोचवले जातात.

भारतीय कृषिअनुसंधान परिषद, नवी दिल्लीतर्फे दिला जाणारा 1997 चा सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार विद्यापीठाच्या एकूण कार्यासाठी मिळाला आहे. अशा या
विद्यापिठाला भेट देणे हा एक वेगळाच अनुभव ठरतो. कॉन्क्रीटच्या जंगलात राहणा-या आणि प्रदुषणाच्या विळख्यात दैनंदिन जीवन जगणा-या शहरवासीयांना या सुजलाम सुफलाम् वातावरणाचा मोह पडतो. आवर्जून जाऊन संशोधन व उपक्रमांची माहिती घ्यावी असे हे ठिकाण आहे.

बुरांडी नाक्याच्या अलीकडे असलेल्या माहीती केंद्रात जाऊन तेथील कायमस्वरूपी कृषिदर्शन पाहाता येते व तेथेच विद्यापिठाची माहिती पत्रकेही मिळतात. पूर्वपरवानगीने विद्यापीठ परिसरही पाहाता येतो.

सेंट अ‍ॅन्ड्रयुज चर्च

दापोली-हर्णे रस्त्यावर केळसकर नाक्याजवळ डावीकडे एक भव्य, दगडी परंतु भग्न इमारत दिसते. त्यावर व भोवती झाडी माजलेली आहे. हेच दापोलीतील सर्वांत जुने सेंट अ‍ॅन्ड्रयुज चर्च. 1810 सालच्या सुमारास बांधून पूर्ण झालेले हे चर्च गॉथिक रोमन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे चर्च इंग्लंडमधील एका प्रसिध्द चर्चची प्रतिकृती आहे. ब्रिटीशांच्या लष्करी ठाण्यातील अनेक अधिकारी व सैनिक यांच्या प्रार्थना व इतर धार्मिक गरजा भागवण्याच्या दृष्टीने या चर्चची उभारणी झाली होती. चचच्या बेल टॉवरमध्ये पूर्वी 6 फूट उंचीची घंटा होती. तिचा आवाज त्या वेळी खूप लांबवरच्या परिसरात ऐकू जात असे. 1938-39 च्या सुमारास या चर्चमधील प्रार्थना तत्कालिन परिस्थितीमुळे थांबली. त्यानंतर आजपर्यंत ती वस्तू अत्यंत दुर्लक्षित राहिले. त्यामधील अनेक चीजवस्तू हळूहळू चोरीस गेल्या. 6 फुटी घंटा हुबळी येथील चर्चमध्ये हलवली आहे. एकेकाळची ही धार्मिक ऐतिहासिक वास्तू आज मात्र भयाण अवस्थेत एकाकी आहे.

गणपती मंदिर

दापोली शहरापासून तीन किमी. वर असलेल्या ब्राह्मणवाडीत डांबरी सडकेपासून उजव्या हाताला कच्च्या रस्त्याने गेल्यावर गणपतीचे जागृत देवस्थान आहे. शिवपूर्वकसलीत याची निर्मिती झाली असे सांगितले जाते. सभामंडक, गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराच्या बाजूला असलेली विहीर. त्यालीच पुष्करणीही म्हणतात.

मंदिरासमोरील तलाव मराठा सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सैन्य व घोडे यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बांधल्याची माहिती मिळते. त्यांच्या सैन्याच्या जागेवरून त्या भागाला लष्करवाडी असे नाव पडले. या तलावात असंख्य मनमोहक कमळें उमललेली असतात.

जागृत असे हे स्थान असून नवसाला पावणारा देव अशी ग्रामस्थांची श्रध्दा आहे. गणपतीची मूर्ती दीड-दोन फूट उंचीची असून ऑईलपेन्टने रंगविल्यामुळे तिचे मूळ रूप दिसू शकत नाही. मंदिराच्या गाभा-यात अता संगमरवर लावला आहे. शेजारीच शंकराचे मंदिर असून त्यासमोर दीपमाळ आहे.
हे गणपती मेदिर असले तरी येथे नृसिंहजन्मोत्सव साजरा केला जातो. त्याला सव्वाशे-दीडशे वर्षांची परंपरा आहे. त्याकाळी ब्राह्मणवाडीत दोन उत्कृष्ट वेदपाठशाला होत्या.

दूरदूरच्या गावांतून येणा-या काही विद्यार्थ्यांच्या गावी नृसिंहजन्मोत्सव साजरा हात असे. त्यासाठी जाऊन येण्यास महिना-दोन महिने अध्ययनात खंड पाडून जावे लागे. म्हणून तो उत्सव या मंदिरात करण्याची प्रथा सुरू झाली. ती आजतागायत चालू आहे. या मंदिराला नृसिंहाचे मंदिर हेही नाव यामुळेच पडले. शंकराच्या मंदिराशेजारी वेदाध्ययनातील एका अधिकारी व्यक्तीची समाधी आहे.

मंदिर परिसरात वड, पिंपळ, आंबा, चंदन अशी झाडे असून सभोवताली वा-यावर डुलणारी शेती, कोणत्याही मोसमात असलेले आल्हाददायक वातावरण यामुळे वनभोजनाचा कार्यक्रम येथे करण्याचा मोह टाळता येत नाही.

याशिवाय दापोली-दाभोळी रस्त्यावर जालगावातच श्री लक्ष्मीनारायणाचे प्राचीन दगडी मंदीर आहे. येथे रामनवमीचा उत्सव मोठया प्रमाणावर होतो. त्या वेळी लाकडी स्थरावरून भालदार-चोपदारांसह निघणरी मिरवणूक प्रेक्षणीय असते 

 

      © Ketki Beach Resort. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions