Tourist Attractions

   
कडयावरील श्री गणपती मंदीर, आंजर्ले
  
आंजर्ले गाव रत्नागिरी जिल्हयात समुद्रकाठी उत्तर अक्षांश 17फ्-42' वर आणि पूर्व रेखांश 73फ्-8' वर वसले आहे. आंजर्ल्यास येण्यासाठी मुंबई-आंबेत-मंडणगड-कांदिवली-आंजर्ले असा रस्ता आहे.या रस्त्याला थेट मंदिरापर्यंत पोहचणारा जोड रस्ता आहे. पुणे कोल्हापूर, कराड ही गांवे दापोलीला महामार्गाने जोडलेली आहेत. दापोली-आसूद-आंजर्ले असा दुसरा मार्ग आहे. आंजर्ले खाडीवरील पुलाचे काम पूर्ण होऊन 1 जानेवारी 2006 पासून हा रेवस-आंजर्ले-दापोली-रेड्डी सागरी महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

मंदिराचा प्राचीन इतिहास

मंदीराचा इतिहास शोधण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि त्यांतही कोंकणातील आद्य वसाहतकारांच्या इतिहासाचा मागोवा घेणे इष्ट आहे. इतिहासकार वि.का. राजवडे यांच्या मताप्रमाणे इ.सन पूर्व 6 व्या शतकापासून महाराष्ट्रात वसाहतीला सुरूवात झाली. यांत पंजाबातून आलेले नागवंशीय (नागपूर या नावांत त्यांचे आगमन नोंदलेले आहे.), मगधांतून महाराष्ट्रिक, राष्ट्रिक आणि उत्तरकुरू प्रांतातून वैराष्ट्रिक लोक (वाई, विराटगड या नावांत त्यांचे आगमन नोंदलेले आहे.), भोज प्रांतातून सत्वक (सतीयपुत्र) लोक आले. भोजले, भोसले ही आडनावे आणि कोकणातील सावंतवाडी उर्फ सत्ववाटिका ही नांवे भोज प्रांतांतील सत्वक जमातीवरून आली. (आधार राजवाडे लेखसंग्रह. प्रकरणे 10, 12, 13). डोंगरद-यांनी व जंगलाने व्यापलेला कोकण प्रांतात फार उशीर वसाहत झाली. मुरूड आणि गुहागर या गावांच्या वसाहतीचा लेखी इतिहास पुस्तक रूपाने उपलब्ध आहे. भविष्य पुराणांत सारस्वताच्या कोकणांतील वसाहतीचा इतिहास आहे. चित्तपावन ब्राह्मण (ना.गो. चापेकर) इतिहास 16 व्या शतकाच्या मागे जात नाही. अस्तु.

आंजर्ले गांवच्या गणपती मंदिराच्या निर्मितीचा इतिहास शोधता आपण 11 व्या शेतकांपर्यत मागे जातो. 12 व्या शेतकांत मंदिर निर्मिती समवेत मंदिरासमोरील तलाव आणि मंदिरा सभोवतालची तटबंदी यांची रचना पूर्ण झाली. हे प्राचीन मंदीर (बहुधा) लाकडी खांबावरील कौलारू किंवा गवताच्या छपराचे असावे. कमानींची रचनापध्दती भारतात अज्ञात असण्याच्या काळांत आणि कोकणांत आढळणा-या जांभ्या दगडाच्या उपयोगाला मर्यादा असल्याने लाकडी खांबावर आधारित मंदिर रचनेला अन्य पर्याय नव्हता. जांभा दगड ढिसूळ असून मुरूमापासून बनलेला द्वितीय श्रेणीचा दगड आहे. (सेकंड जनरेशन स्टोन).

मंदिराचा अर्वाचीन इतिहास आणि मंदिवर्ण

मंदिराचे तत्कालीन व्यवस्थापक राकृष्ण भट हरि नित्सुरे यांना स्वप्नाष्टांत झाला की, या फार जीर्ण झालेल्या मंदिराच्या जागी अत्यंत त्वेरेने नवीन मंदीर बांध (जीर्णम् गृहमसुढम् अत्र विधेहि शीघ्रम). हा आदेश झाल्यावर रामकृष्णांनी दादाजी घाणेकर (पुणे) आणि रघुनाथ कृष्ण भट (धारवाड) यांचे आर्थिक सहाय्य घेऊन मूळ मंदिराच्या जागी आज विद्यमान असणारे जांभ्या दगडाने कलशयुक्त मंदिर नव्याने उभारले. हे काम इ.स. 1768 ते 1780 इतका काळ चालून एकूण खर्च रू. 50 हजार आला. (आजच्या भाषेत सुमारे साडेतीन कोटी रू.) भक्त जनांनी गणपतीचे पाऊल पाहावे.

मंदिराच्या रचनातंत्राची वास्तुशास्त्रीय माहिती

या पूर्वाभिमूख मंदिराची लांबी 55 फूट, रूंदी 39 फूट आहे. या मंदिराच्या रचनेत प्राचीन भारतीय (वाकाटक कालीन), मध्ययुगीन रोमन (बैझंटाइन ) आणि अर्वाचीन पाश्चात्य (गोथिक) वैशिष्टयांचा एकजीव कलात्मक संगम केलेला आहे. वाकाटक राजकालांत (इ.250-550) महाराष्ट्रांत त्रिस्तरीय मंदीर रचनेचा आरंभ झाला. या पद्धतीत गर्भागार, सभागार आणि दोहोंना जोडणारा अंतराल असे तीन भिन्न विभाग असतात. (अंतरालामध्ये घंटा टांगल्या आहेत.) नेमके हेच रचनातंत्र गणपती मंदीरात वापरेलेल आहे. मात्र हे साम्य येथेच संपते.

सभागाराला 8 कमानी आहेत तर गर्भागारांतही 8 कमानी आहेत. कमानी उभारण्याचे तंत्र प्राचीन असले तरी भारतात ही पद्धती 15 व्या शतकात प्रचलीत झाली. या पद्धतीत भिंतीचे संपूर्ण वजन वरील घुमटासह भिंतीच्या पायावर परावर्तित करतात.

प्रगत तंत्रशुध्द पद्धतीची घुमटाकाराची रचना असलेले सेफिया कॅथेड्रल कॉन्टॅन्टिनोपल येथे (इ.स. 532-537) बांधण्यात आले. (बैझंटाइन पद्धती). घुमटाकाराची बांधणी करण्यापूर्वी चौरस चार भिंतीचे अष्टकोनांत रूपांतर करण्याची युक्ती वापरत. नेमके हेच बैझंटाइन तंत्र या मंदीराच्या सभागाराच्या आणि गर्भगारावरील घुमटांची बांधणी करताना वापरले आहे. (सतराव्या शतकात ही पद्धती दक्षिण भारतात आली. इ. 1630 विजापूरचा गोलघुमट).

गर्भगारांच्या शिखरांची बांधणी करताना एक वैशिष्टयपूर्ण तंत्राचा वापर केलेला आहे. गर्भगारावरील पहिला घुमट आतल्या बाजूने 35 फूट उंच आहे. तो बांधण्यापूर्वी चार चौरस भिंतीचे अष्टकोनाकृतीचे आठ पाय गर्भगाराच्या जमिनीवरील टेकलेले असल्यारले गर्भगाराची आतील बाजू पूर्णपणे अष्टकोणी आहे. घुमआच्या शिराकेबिंदुवरील उमलत्या कमल पुष्पाच्या पाकळयांचे डिझाईन होते. काळाच्या ओघात या दगडांचे विघटन होऊन इ.स. 2002 मधे ही कमलाकृती कोसळून पडली. अंतरालाच्या पटृटीत उत्तर-बाजूने मंदिराच्या गच्चीवर जाण्यासाठी जिना आहे. गच्चीवर जाऊन पुढील वर्णन पाहावे. गर्भगाराच्या 4 भिंती बाहेरच्या बाजूने पुन्हा वर उचलून गच्चीवर पाच फूट उंचीचा चौरस करून पुन्हा एकदा त्याचे अष्टकोनाकृती रचनेत रूपांतर केले आहे. या उचललेल्या भागातच गर्भागारांत सूर्यप्रकाश व उजेड येण्यासाठी द्वार ठेव्ाले आहे. गच्चीवरच्या गर्भगारावरील या दुस-या अष्टकोनी रचनेच्या आधाराने दुसरा एक सुमारे 10/11 फूट उंचीचा व आतून पोकळ असलेला घुमट उभारला आहे. या दुस-या घुमटाचा बाह्यभाग नानाविध आकृतिबंधानी आणि वेलबुट्टीने परिवेष्टित असून 16 उपकलश आणि अष्टविनायकांच्या प्रतिमा यांनी नटलेला आहे. (कळसावरील या दुस-या घुमटात प्रवेशासाठी असलेले छोटेसे द्वार द्वितीय जिर्णोधाराच्या वेळी इ. 1991 मध्ये बंद करून त्या जागी मोरगावच्या गणपतीची प्रतिकृती स्थापन केली.) या दुस-या घुमटाच्या वर कलशाकृति शिखर कमलदलांवर विसावले असून त्याची निमुळती अग्रशिखा (Tapering point) अवकाशाचा भेद करीत आहे. बैझंटाइन पद्धतिचा घुमट उपडया हंडीच्या आकाराचा (मेणबत्ती लावण्याच्या हंडीसारखा) असतो. या घुमटांचे हिंदूकरण करताना त्या वेळच्या स्थपतीनी विलक्षण चातुर्य प्रकट केले आहे. या सर्व घुमटांच्या शिरोबिंदूवर कमलपुष्प आहे. तर बाह्य भाग कलशाकृती असून त्याच्या बैठकीच्या जागी कमळाच्या पाकळयांची वेलबुट्टी आहे. गर्भगारावर एकूण 12 कळस आहेत.

गर्भगारावरील दुस-या घुमटाची रचना करताना अवशिष्ट चारी कोप-यात उंच मनोरे (पिनॅकल्स अथवा टेपरिंग स्पायर्स) बांधण्यात आले. अशा त-हेने मनोरे युरोपात प्रबोधन काळात बांधलेल्या (गोथिक स्टाईल) ख्रिस्त मंदिरात 12 व्या आणि 13 व्या शतकात प्रथम बांधण्यात आले. युरोपातील मनोरे निमुळते टोकदार असतात, तर आपल्या मंदिरात त्यावर संस्करण करून कलशांची स्थापन केलेली आहे.

तीन विभिन्न संस्कृती आणि विभिन्न कालखंडातील वास्तूरचना तंत्रांचे संमिलन करताना त्यांना एकात्म भारतीय परिवेश देणारे कलाकार धन्य होत.

सभागारावरील बसक्या आणि दणगट (Massive) बांधणीचा घुमट पृथ्वीशी आणि जडतेशी नाते जोडतो. उलटपक्षी गर्भागाराचे अवकाशात झेपावणारे नाजूक निमुळते शिखर अनंत आकाशाशी सख्य जोडते. त्यामुळेच सौंदर्यद्रुष्टी असलेल्या भक्ताला सभागारांत प्रवेश करतांना सान्तामधून अनंतात आणि जडतेतून चैतन्याकडे प्रवास केल्याचा प्रत्यय येतो.

मंदिराला लाभलेले सौदर्याचे वरदान

आंजर्ले गावाला विस्तृत किनारा लाभला आहे. सागर किनारी आणि खाडी काठची भरती-ओहोटीच्या वेळची जनक्रीडा पाहणे हा संस्मरणीय अनुभव आहे. सदाहरित वृक्षराजीची शाल पांघरून अत्यंत नीरव वातावरणात गाव पहुडलेले असते. पक्ष्यांच्या मंजूळ कूजनाने आला तर आल्हादकारक व्यत्यय येतो. मंदिराचे पांढरेशुभ्र कळस दूर अंतरावरूनच भक्तमंडळिंना खुणावत असतात. गर्द झाडीत लपलेल्या मंदिराची मानवनिर्मित कलाकृती केवळ अनुपम आहे. पण या सगळया चराचराशी एकदा भावनिक तादात्म्य साधले की सकाळ संध्याकाळच्या रंगांनी रंगलेले मंदिर, चांदण्यांच्या धूसर प्रकाशात आणि पौर्णिमेच्या सुधारसांत स्नान करणारे मंदिर, पावसाळयातील सागराचे रक्तरंजित तांडव आणि त्याचवेळी धुवाधार पावसांत सचैल स्नान करणारे मंदिर, असे सौदर्याचे परोपरीचे आविष्कार केवळ रसिक मनालाच जाणवतात. दृक् प्रत्ययापलीकडील आनंदभूमींत जाण्याची किमया, हे तर देणे ईश्वराचे.

मंदिराचे एकमेवाद्वितीय वैशिष्टय

इ.स. 1780 मध्ये बांधलेल्या या मंदीराला इ. 1990 मध्ये 210 वर्ष पूर्ण होत होती. या 210 वर्षाच्या कालावधीत ऊन-पाऊस-वारा आणि हवेतील क्षाराने मंदिराचे बाह्यलेपन ढिसूळ व सच्छिद्र बनले होते. नित्सुरे व्यवस्थापनाचे मंदिर जीर्णोध्दाराचे काम हाती घेवून 30 नोव्हेंबर 1990 ते 24 फेब्रुवारी 1996 (प्रत्यक्षकामाचे दिवस 439) या कालावधीत जार्णोध्दाराचे काम पूर्ण होईल. थोडा तपशील माहितीसाठी आवश्यक आहे.

अ) हे दुरूस्ती काम करताना अत्याधुनिक केमिकल्य रिवविली. नंतर बाह्यांगाची दुरूस्ती केली ( कॉस्मेटिक रिपेअर). या कामी वापरलेली केमिकल्स 1. डिस्टामेंट डी. एस.पावडर, 2. नाफूफिल बी.बी.2, 3. इएमसीक्रीट, 4. डिस्टामेंट डीएम (लिक्किड), 5. नाफूक्किक पावडर, 6. प्रासमेक्स, 7. डिस्टामेंट डी.एम. पावडर, 8. इएमसी कलर फ्लेक्स (लिक्किड), 9. रूफेक्स 2000(बाह्यरंग), 10. सीमेंट. कळसांच्या व बाह्य भागाच्या दुरूस्तीला रू. 4,01,988 इतका खर्च झाला.

ब) मंदिराच्या अंतर्भागाची दुरूस्ती उदयपूर (राजस्थान) येथील राजप्रसाद आणि भव्य मंदिराच्या पद्धतीने केल्याने आतल्या भिंती आणि घुमटांचा भाग जण संगमरवरी दगडाचा असल्यासा भास होतो. या कामात फार कौशल्य व प्रदीर्घ अनुभव असावा लागतो. यासाठी उदयपूर परिसरातून कारागीर आणवले होते. यात आरास (संगमरवर दगड भट्टीत भजून बनवलेला चुना) आणि जिंकी (संगमरवर दगडाची बारीक रेती) यांचा वापर होतो. खर्च रू. 1,54,716 इतका झाला. जीर्णोद्धारचा एकूण खर्च रू 8 लक्ष15 हजार 794 इतका झाला.

मंदिर व्यवस्थापन पद्धती

या प्राचीन मंदिराचे निर्माते आणि व्यवस्थापक कोण होते याचा इतिहास अज्ञान आहे. इ.स.1630 पासूनचा (म्हणजे छत्रपती शिवाजी जन्मकालापासून) इतिहास ज्ञात आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे लेखन हा व्यवस्थापक कुटुंबाच्या 12 व्या पिढीचा प्रतिनिधी आहे. सतत 12 पिढयांपर्यत या देवस्थनाचे व्यवस्थापन (वेदशाळाकूट) नित्सुरे घराण्याकडे नांदले.

भारतावरील ब्रिटीश सत्तेचा अस्त झाल्यावर लोकशाही पद्धती भारतात स्थिरावली. सामाजिक समतेच्या युगाची नांदी झाली. आज या मंदिरात कोणत्याही जातीच्या (ब्राह्मण, भंडारी, कूणबी, महार, चांभार) गणेशभक्ताला स्वहस्ते श्रीपूजा करण्याचा अधिकारी आहे. यासाठी नित्सुरे विश्र्वस्तांनी पुढाकार घेऊन आवश्यक ती घटना दुरूस्ती केली आहे. (अर्ज क्र. 126/1982 वरील धर्मादाय आयुक्त निर्णय पत्र दि. 6 जून 1983 घटना कलम 27.All Hindus shall have the right to to attend and worship the Diety......etc.... )

नंतर नित्सुरे विश्र्वस्तांनी पुढचे पाऊल उचलून या मंदिराचे दरवाजे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, ज्यू आदि सर्व धर्मियांसाठीखुले केले. आज सर्व धर्मीयांसाठी या विश्वात्मक, विश्वाधार, मूलाधारस्थित, ॐ कार स्वरूप श्रीगणेशाचे मुक्त दर्शन करता येते. शिव: अद्वैत: एवम आत्मा एव। (मांडुक्य उपनिषद) अशी ही गणेशदेवता भक्तांवर सदैव अनुरक्त असते.

नव्या युगाच्या हाकेला ओ देऊन नित्सुरे कुटुंबियांनी समयोचित निर्णय घेऊन 29 सप्टेंबर 1996 या दिवशी देवस्थान विश्वस्त मंडहाचा कारभार सर्व समाजाचे प्रतिनिधी असणा-या ग्रामस्थ विश्वस्तांकडे हस्तांतरित केला.

गणेश वंदना

मंदीरातील ऋध्दिसिध्दिसहित वरदहस्त सिध्दिर्विंनायकाच्या मूर्तींचे ध्यान प्रसन्न, गंभीर, महातेजस्, आनंदमय, मांगलिक आणि अभय देणारे आहे. तुकोबांच्या शब्दांत

अनंता, अरूपा, अलक्षा, अच्युता। जालासी साकार भक्तकाजा।
जे का रंजले गांजले। त्यांसी म्हणे जो आपुले।।......
ज्यासी आपंगिता नाही। त्यासी धरी जो हृदयी ।।......

मंदिरात त्याचप्रमाणे अशा भक्ताच्या घरी देवाचे वास्तव्य असते.

स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे की तुम्हाला ईश्वर दर्शन हे असल तर लोकसेवेला, लोकल्याणाच्या कामाला वाहून घ्या म्हणजे लोकांच्या ठिकाणी ईश्वर दर्शन होईल.

भक्तिमार्गावरील एक अभिनव दिशा

तुकाराम आणि विवेकानंद यांच्या मार्गदर्शनानूसार आजमितीस सामाजिक समता आणि सामाजिक अभिवृध्दि या कामांना विश्वस्तांनी वाहून घेतल्याने शिक्षण निधि, समाजकल्याण, निधी, ग्रंथालय निधी, क्रीडा विविधा निधि, वृक्षारोपण निधी असे उपक्रम देवस्थानन्यासाने कार्यान्वित केले आहेत.

आवारातील शंकराच्या मंदिराचा जीर्णोध्दार

10 फेब्रुवारी 10 मे 2004. मंदिराच्या काळया दगडांतील सांधे 10-10 या केमिलिने भरण्यात आले. नंतर दगड भिंतीवर BECKBON Pu 24 A हे केमिकल चोपडयात आले. घुमटाकार लोखंडी जाळी अबसवून सीमेंट लावताना MICRO SILICA ( रेशमाचे धाके) 168 किलो मिसळण्यात आले. अन्य तपशील गणपती मंदिर जीर्णेध्दारप्रमाणे. खर्च रू. 2 लक्ष 21 हजार 134.

भक्तिधाम निर्मिती

भक्तजनांची दीर्घकालीन अपेक्षा पुरविण्यासाठी देवस्थान विश्वस्थानी (खर्च रू 14,67,927) भक्तिधाम वास्तुनिर्मितीचे काम अग्रक्रमाने हाती घेतले. त्रिपुरा पौर्णिमा 19 नोव्हेंबर 2002 या दिवसापासून भक्तिधाम अभिजनांच्या वास्तव्यासाठी सुसज्ज आहे. मंदिरात दर्शनार्थी भक्तांच्या दिवसेंदिवस वाढत्या गर्दीमुळे निवांत उपासना आणि नामस्मरण करण्यासाठी गणपती मंदिराचे एक उपांग म्हणून एकांत ध्यानधारणेसाठी भक्तिधाम बांधण्यात आले.

अंतिम चरणात नि:शुल्क वास्तव्य व्यवस्था हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. मात्र भक्तिधामाच्या14 लक्ष रूपये खर्चावरील प्रतिवर्ष घसाराच रू. 73 हजार येतो. (Sliding System Depreciation). केवळ एवढयासाठीच एक तात्पुरती व्यवसाय म्हणून सध्या भक्तिसाधना स्थायी निधीसाठी स्वेच्छा देणगी देणारास निवास व्यवस्था अग्रक्रमाने उपलब्ध केली आहे. 

 

      © Ketki Beach Resort. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions