Tourist Attractions

   
हर्णे
  

गोवा किल्ला

हर्णे बंदराकडे जाताना वळणावर समोर दिसतो तो गोवा किल्ला. काळया दगडी चि-यांच्या मजबूत तटबंदीत किल्लयांचे प्रवेशद्वार दिसते. दरवाजातून आत गेल्यावर तटावर मारूतीची मूर्ती आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूंस तळाशी वाघासारखे शिल्प कोरले आहे, तर डाव्या हाताला गंडभेरूड व त्याने पकडलेल्या चार हत्तींचे वैशिष्टयपूर्ण शिल्प आहे. उजव्या हातास हत्तींच्या आकृती कोरलेल्या आढळतात. किल्लयात एकही इमारत शिल्लक नाही, परंतु काही जोती दिसतात. तटबंदी मात्र थोडीशी पडझड वगळता सुस्थितीत आहे. त्यावर चढून जाण्यासाठी जागोजागी पाय-या आहेत. तटावरून पाण्यात दिसणारा सुवर्णदुर्ग आणि तटाच्या भिंतीशी समुद्राच्या लाटांचा चाललेला खेळ जळवून न्याहाळता येतो. येथून सुवर्णदूर्गाच्या पाठीमागे अस्ताला जाणारा सूर्य आणि त्याचे छायाचित्रण हे एक आव्हान आहे. वेगवेगळया अँगल्समधून दिसणारे हे दृश्य विलोभणीय आहे. हा देखावा म्हणजे तुमच्या अंजर्ले सहलीच्या आनंदाला लाभलेली सोनेरी किनार आहे. सध्या मात्र किल्याच्या रस्त्यालगतच दरवाजा बंद असून समुद्राच्या बाजूला सुवर्णदुर्गाच्या दिशेला जिथे तटबंदी पडली आहे. तेथून आत प्रवेश करावा लागतो.

फतेगड

गोवा किल्यापासून थोडे पुढे आल्यावर कस्टम ऑफिसच्या उजवीकडे एक टेकाड दिसते. या ठिकाणी पूर्वी फतेगड होता. तो सुवर्णदुर्गाचा उपदुर्ग म्हणून समजला जात असे. या किल्लयाच्या ठिकाणी आता कोळी वस्ती असून, तटबंदी पूर्ण पडून गेल्याने किल्लयाच्या खुणा पूर्णपणे हरवून गेल्या आहेत. बंदरावरील दीपगृहाकडे जाताना पहिल्या बुरूजापासून मागे वळून पाहिल्यास जे टेकाड व कोळी वस्ती दिसते तेच गोवा किल्याचे नेमके स्थान. भरतीच्या वेळी किल्याच्या पासथ्याशी , खडकांवर आपटून उसळणा-या लाटांमध्ये मनमुराद भिजता येते.

कनकदुर्ग

फतेगडहून मोटार रस्त्याने धक्क्याकडे जाताना डाव्या हाताला दोन पकडे बुरूज दिसतात. त्या मधून गेलेल्या पाय-याने वर चढून गेल्यावर समोर समुद्रात सुवर्णदुर्ग दिसतो. या बुरूजांपासून दीपस्तंभापर्यंत कनकदुर्गाचा विस्तार होता. आता मात्र थोडीच तटबंदी शिल्लक आहे. कनकदुर्ग आणि फतेगड सुवर्णदुर्गाचे उपदुर्ग आहेत. याची उभारणी कोणी व केव्हा केली याबाबत मतभेद आहेत. तथापि 18 व्या शतकाच्या पहिल्या दोन दशकात याची निर्मिती झाली हे निश्चित.

दीपस्तंभ

कनकदुर्गाची पाय-यांनतरची चढण चढूण गेल्यावर आपण हर्णेच्या दीपस्तंभापाशी पाहोचतो. हे दीपगृह शंभर वर्षांपेक्षा जास्त पूर्वीचे असून, महाराष्ट्र कोकण किनारपट्टीतील वापरात असलेले सर्वांत जुने दीपगृह आहे. मच्छीमारी बोटींसाठी याचा उपयोग होतो. दंडगोलाकार अशा या दोन मजली दीपगृहावर सोलर सिस्टीम बसवली असल्याने वर जाता येत नाही. येथून सुवर्णदुर्ग, हरिहरेश्र्वरचा डोंगर, कडयावरचा गणपती, हार्णे बंदर, मुरूड-कर्देचा समुद्रकिनारा आणि थेट दाभोळाच्या खाडीपर्यंतचे विलोभणीय दृश्य दिसते. कर्मचा-यांशी संवाद साधून दीपगृहाच्या सिग्नल्सची माहिती आवर्जून घ्यावी. या परिसरात फोटो काढण्यास बंदी आहे.

हर्णे बंदर

हर्णे बंदरालगत कोळी व मुस्लिम वस्ती मोठया प्रमाणावर आहे. पूर्वी वाहतूकीची साधने उपलब्ध नव्हती तेव्हा जलमार्ग वाहतुकीतील हर्णे हे महत्वाचे बंदर होते. येथे मासेमारीचा व्यवसाय मोठया प्रमाणावर चालतो. विशेषत: सायंकाळी 4 ते 7 या वेळात चाललेला माशांचा लिलाव पाहण्या-ऐकण्यासारखा असतो. लाखो रूपयांची उलाढाल करून हे मासे परदेशीसुध्दा निर्यात केले जातात. बंदराच्या रस्त्यावर अनेक मोठयामोठया मासेमारी बांटींची बांधणी, देखभाल, दुरूस्ती ही कामे चालतात. पाण्याखालचा बोटीचा तळ, त्याची रचना पाहण्यासारखी असते.

कॅथॉलिक चर्च

हर्णे गावाकडून पाजपांढरी गावाकडे जाताना साधारण तीन कि.मी. अंतरावर उजवीकडे डोंगराच्या पायथ्याशी कॅथॉलिक पंथाच्या चर्चची पांढरी इमारत दिसते. हे चर्च साधारणत: 200 वर्ष जुने असावे. परंतु नेमकी माहिती मिळत नाही. जुने लाकडी नक्षीकाम असलेले 12 ते 15 फूट उंचीचे भव्य ऑल्टर वेदी असून मदर मेरी, येशूच्या मूर्ती, क्रॉस व काही तसबिरी ठेवलेल्या आहेत.

सुवर्णदुर्ग

किना-यापासून एक मैल पाण्यात असलेला व दोन एकर जागा व्यापून राहिलेला हा किल्ला 1660 च्या सुमारास शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला व त्याची फेरबांधणी केली. काहींच्या मते 16 व्या शतकांत विजापूरकरांनी तो बांधला, तर काहींच्या मते शिलाहार राजवटींपासूनच तेथे दुर्ग होता. परंतु याबाबतच फारसे संशोधन झालेले नाही. त्यामुळे त्याच्या कालनिश्चितीवर प्रकाश पडत नाही.

अखंड व भक्कम तटबंदी असलेल्या या दुर्गाला सुमारे 15 बुरूज आणि दोन दरवाजे आहेत. किना-सावरून होडीने या किल्ल्यात जावे लागते. वाळूच्या छोटयाशा पुळणीवरूण प्रवेशद्वाराकडे जाता येते. हे प्रवेशद्वार विशिष्ट बांधणीमुळे तटबंदीत लपले आहे. अगदी जाईपर्यंत त्याचा नेमका अंदाज येत नाही. किल्ल्याच्या तटावर मारूती तर पायरीवर कासव कोरलेले आढळते. सर्व किल्लाभर वड आणि बोरीची झाडी मजली आहे. बुरूजांलगत असलेल्या काही खोल्या व दोन कोठारे एवढेच बांधकाम आता शिल्लक आहे. तटाला लागून एक हौद व विहीर आहे. एका वाडयाचे प्रवेशद्वार व काही अवशेष दिसतात. दुसरा चारदरवाजा समुद्राच्या बाजूला आहे. तेथवर उतरण्यासाठी तटामधून जिना बांधलेला आढळतो. मराठी आरमाराच्या पडत्या काळाबरोबरच मराठी सरखेल कान्होजी आंग्रेंच्या देदीप्यमान कारकर्दीचाही हा किल्ला साक्षीदार होता. या किल्याच्या दुय्यम किल्लेदारपदी कान्होजींचे वडील होते. त्यानंतरच याच किल्ल्यावर कान्होजींनी उमेदवारी केली. या काळात म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या करकर्दीत सुवर्णदुर्गावर सिद्दींचे आक्रमण झाले असता मुख्य किल्लेदाराची फितूरी कान्होजींनी उघडकीस आणली व त्याचा शिरच्छेद करून किल्ल्याच्या लढयाचे यशस्वी नेतृत्व करून हल्ला परतवून लावला. यामुळे नंतरच्या काळात त्यांना सरखेल ही पदवी देऊन मराठी आरमाराचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.1996 साली सुवर्णदुर्ग कान्होजी आंग्य्रांचे केंद्र होते. येथन त्यांच्या पराक्रमी कारकर्दीची सुरवात झाली. कान्होजींनंतर त्यांचा मुलगा तुळोजी गादीवर आला, पण तो पेशव्यांना जुमानेसा झाला. पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने तुळोजीवर हल्ला केला. इंग्रज या संधीची वाटच पाहत होते. दोघांनी मिळून तुळोजीचा सपशेल पराभव केला आहे आणि किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला.

1802 साली यशवंतराव होळकरांच्या हल्ल्यामुळे दुसरा बाजीराव पुणे सोडून काही काळ या सुवर्णदुर्गात आश्रयाला होता. नोव्हेंबर 1818 साली पेशव्यांकडून इंग्रजांनी फारसा संघर्ष न करता तो ब्रिटिश अंमलाखाली आणला. असा सुवर्णदुर्गाचा थोडक्यात इतिहास सांगता येतो. इंग्रजांच्या आगमनाबरोबरच सुवर्णदुर्गाची वैभवशाली कारकर्दी संपुष्टात आली 

 

      © Ketki Beach Resort. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions