Tourist Attractions

   
केळशी
  

आशापूरक सिध्दी विनायक

दापोली तालुक्यातील भारजा नदीच्या खाडीलगत ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेले केळशी हे गांव वसले आहे. दोन्ही बाजूस पाणी असल्याने हे गाव बेटासारखे झाले आहे. अत्यंत निसर्गसमृध्द व देखण्या समुद्रकिना-याने या गावाचे संदर्य वाढवले आहे.

केळशी गावात परांजपे आळीच्या सुरूवातीस पेशवेकालीन वास्तुशास्त्राचा उत्तम नमूना असलेले हे गणपती मंदिर आहे. इथे असलेली सुमारे साडे तीन फूट उंचीची संगमरवरी मुर्तीही उत्कृष्ट शिल्पकलकचा नमुना आहे. यालाच पांढरा गणपती असेही म्हणतात. देवळाच्या डावीकडे एक समाधी मंदिर आहे. तर उजवी कडे काळया दगडातील सुंदर पुष्करणी आहे. संपूर्ण मंदिर परिसाला एखाद्या किल्याप्रमाणे 8-1 फूट उंचीची दगडी तटबंदी आहे. आतील बाजूस भिंतीत दिवे लावण्यासाठी सर्वत्र कोनाडे आहेत. येथे माघातील गणेशोत्सव पारंपारिक पध्दतीने साजरा होतो.

महालक्ष्मी मंदीर

गावाच्या दक्षिण टोकाला असणा-या उंटबर डोंगराच्या पायथ्याशी महालक्ष्मी मंदीर आहे. मंदिर उत्तराभिमूख असून बांधकाम पेशवाई काळातील आहे. मंदिरापुढे धर्मशाळा बांधली असून त्यात गणपती शंकराची पिंडी आहे. मंदिर परिसरात एक विहीर तसेच एक तळे असून त्याला बांधीव पाय-या आहेत. त्यात अनेक कमळे उमललेली असतात. मुख्य प्रवेशद्वारापाशी सनई चौघडा वादनासाठी नगार खाना बांधला असून संपूर्ण मंदिराला 8-10 फूट उंचीची तगडी तटबंदी बांधलेली आढळते. या देवळाला दोन घुमट असून एका घुमटाखाली महालक्ष्मीचे स्वयंभू स्थान आहे व दुस-या घुमटाखाली सभागृह आहे. सभागृहात प्रवेश करण्यासाठी तीन बाजूने दरवाजे आहेत.मागील बाजूस असणा-या उंटबर डोंगराच्या घनदाट झाडीच्या पार्श्वभूमीवर हे मंदीर सुरेख दिसते. येथे चैत्र शुध्द अष्टमी ते चैत्र शुध्द पौर्णिमा मोठा उत्सव असतो. हा उत्सव म्ाहाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या खेरीज नवरात्र उत्सव ही साजरा केला जातो. या वेळीस गोंधळ किर्तने रथ यात्रा असे कार्यक्रम असतात. व संपूर्ण गाव जातीभेद विसरून यात सहभागी होते. कोकणातील भावीकाने कोल्हापूरच्या अंबाबाईला बोललेला नवस येथे जाऊन फेडणे शक्य नसेल तर या महालक्ष्मी मंदीरात तो फेडला तरी चालतो. असे येथील महात्म्य आहे.

याकूब बाबा दर्गा

महालक्ष्मी मंदिराच्या उजवीकडून डोंगरावर जाणा-या रस्त्याने 1 किमी.अंतरावर हा इतिहास प्रसिध्द दर्गा आहे. हजरत याकूब बाबा सरवरी रहमतुल्ला दर्गा असे याचे नाव असून हा सुमारे 386 वर्षापूर्वीचा आहे. 1618 मध्ये हैद्राबाद सिंधप्रांतातून याकूब बाबा बानकोट मार्गे केळशीत पाहोचले. त्यांच्या बरोबर सहुलत खान हा 10 वर्षांचा मुलगा होता. हिरजी गोरजी नावाच्या गुजर व्यापा-याने त्यांना होडीतून केळशीत येण्यासाठी आर्थिक मदत केली होती. त्याला हे कोणी अवलिया संत आहेत हे जाणवले होते. तेव्हा पासून याकूब बाबा यांचे केळशीत वास्तव्या होते व त्यानी तेथे अनेक चमत्कार केले. काही ठिकाणी याकूब चा उल्लेख याकूत असाही करतात.

छत्रपती शिवाजी महारांची दाभोळ स्वारीची तसारी चालू असताना त्यांची व याकूब बाबांची भेट झाली. तेव्हा त्यांनी स्वारी न करण्याचा सल्ला दिला. परंतु तयारी पूर्ण झाली असणारी तो न मानता महाराजांनी दाभोळवर चढाई केली. त्या वेळीराजांचे सर्व आरमार वादळात सापडले व परिणामत: मोहिम अर्धवट सोडून द्यावी लागली. दिलेल्या सल्ल्याच्या आठवण होऊन महाराज पुन्हा याकूब बाबांना भेटले. त्या वेळेस बाबांनी दाभोळवर हल्ला करण्याची तारीख शिवाजी महारांना सांगितली. व त्या दिवशी चढाई केल्यावर महाराजांना मोठे यश आले. महाराज पुन्हा येऊन बाबांना भेटले व त्यांनाआपले गुरू मानले. महाराजांनी त्या ठिकाणी दर्गा बांधण्याची ईच्छा व्यक्त केली. त्या्प्रमाणे दगडी चौथरा व त्यावर अत्यंत रेखीव अशा मुसलमानी पध्दतीच्या कमानी बांधल्या गेल्या. व दर्ग्याच्या खर्चासाठी 534 एकर जमिन इनाम दिली. पुढे महारांजाचे निधन झाले. व संभाजी महारांजी दर्ग्याचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते होऊ शकले नाही. काहीजण असे मानतात की याकूब बाबांना स्वत:च्या डोक्यावर छप्पर नको होते. या त्यांच्या इच्छेमुळेच बांधकाम अर्धवट राहिले. या ठिकाणी स्वत: शिवाजी महाराज दोन-तीनदा संभाजी महाराज 2 वेळा, व थोरले बाजीराव एकदा येऊन गेल्याचे नोंद इतिहासात आढळते.

1681 साली याकूब बाबांचे देहावसान झाले. 6 डिसेंबर रोजी येथे मोठा उरूस होतो. उरूसाची सुरूवात करण्याचा मान एका हिंदू माणसाला असतो. हजारोच्या संख्येने मुसलमान व हिंदू भक्त या दर्ग्यावर येतात. 20 व्या शतकातील 6 डिसेंबरच्या पार्श्वभूमिवर हा तारखेचा योगायोग निश्चित काही संदेश देऊन जातो. हिंदूचे श्रध्दास्थान छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे मुसलमान गुरू आणि दर्ग्याच्या उरूसाची सुरूवात एका हिंदू माणसाकडून या गोष्टी जातीपेक्षा माणूस धर्मच श्रेष्ठ आहे असे ठासून सांगतात. येथून जवळच समुद्राच्या बाजूला धोकार शेख दर्गा आहे.

वाळूचा डोंगर

आपल्याला फार क्वचित पाहायला मिळेल असा समुद्राच्या मऊशार वाळूचा डोंगर (टेकडी) या किना-यावर पाहायला मिळतो. या वाळूच्या डोंगराखाली पुरातन संस्कृतीचे काही पुरावे असल्याची माहिती अलिकडेच उजेडात आली आहे. त्याबाबत तज्ञांचे शोध संशोधन कार्य चालू आहे.

खडप

केळशीला सुमारे 3 किमी. लांबीचा रूपेरी वाळूचा समुद्र किनारा आहे. सुरू, केवडयाची वने, नारळी सुपारीच्या गर्द झाडीच्या सान्निध्यात सागर लाटांचे संगीत अनुभवाया मिळते. हा समुद्रकिनारा पोहण्यास धोकादायक नाही. परंतु स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन मगच पाण्यात उतरावे. समुद्रकिना-याच्या खडकाळ भागास स्थानिक भाषेत खडप म्हणतात. समुद्रात जेथे उटंबरचा डोंगर घुसला आहे. त्या ठिकाणी खूप मोठे मोठे काहे पत्थर आहेत. सागरसंपत्ती मिळण्याचे केळशीतील हे एकमेव ठिकाण. शंख-शिंपले, कवडया, समुद्रफेणी, निरनिराळया आकारांची समुद्र प्राण्यांची घरे इ. सर्व गोष्टी या ठिकाणी मिळतात. येथून आपल्याला हर्णे येथील सुवर्णदुर्गही दिसतो 

 

      © Ketki Beach Resort. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions