Tourist Attractions

   
कोळथरे - मंदिराचे गाव, समंद्रकिनारा
  

पांढ-या शुभ्र विस्तीर्ण वाळूच्या पुळणीचा कंठा माहून निसर्गाच्या कुशीत शांत पहुडलेले हे गाव आहे. गावातील मुख्य छोटा रस्ता आणि दोन्ही बाजूंना एकमेकांचा शेजार धरून उभी असलेली उतरत्या छपरांची अस्सल कोकणी घरे आपले लक्ष वेधून घेतात.

डोंगरकपारीतून येणा-या जीवंत झ-याला मढीचे पाणी म्हणतात. गावाच्या दक्षिणेला पाचक गुणधर्म असलेल्या या पाण्याचा एक छोटा तलाव निर्माण झाला आहे. याच ठिकाणी वरच्या बाजूस आजूबाजूच्या जंगलात मोर आढळतात. येथील सागरकिना-यावर काळया कवड्या विपुल प्रमाणात सापडतात. येथून जवळच्याच डोंगरात समुद्राचे पाणी वर्षांनुवर्षे खडकावर आपटून एक खोल विवर तयार झाले आहे. त्याला घळई म्हणतात. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी आत शिरते व उसळून त्याचा जलस्तंभ तयार होतो. त्यावेळी होणारा पाण्याचा मोठा आवाज वातावरण भारून टाकतो. किना-याच्या उत्तरेला डोंगरकपारीत एक गुहा तयार झाली आहे. त्याला वाघबीळ म्हणतात. त्यापुढे चालत गेल्यावर अतिशय गुळगुळीत आणि मऊशार वाळूचा पायाला स्पर्श होतो. त्या ठिकाणी समोर दिसते ती मदन नदी. या सर्व भागात फिरताना गावातील एखाद्या माहितगाराला सोबत नेल्यास सोयीचे होते.

श्री कोळेश्वराच्या मुख्य मंदिराखेरीज येथे श्री लक्ष्मी, विष्णुमंदिर, श्री गणपती, मारूती, जाखाय-काळकाय या ग्रामदेवता तसेच राममंदिर, दततमंदिर, खेममंदिर, दुर्गादेवी मंदिर, बापेश्वर, वाटेबुवा, ब्राह्मण आळीतील दत्तमंदिर आणि सोनार आळीतील गणपती मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. म्हणून कोळथ-याला मंदिराचे गाव असे म्हणतात. श्री कोळेश्वराचे मोठे मंदिर तीन भागांचे असून त्याभोवती दगड फरसबंदी तट, धर्मशाळा, मंदिरापर्यंत आणलेली चिरबंदी पाट अशा गोष्टी आहेत. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर आता पांढ-या रंगात रंगवलेले आहे. या मंदिराची बांधणी, कळस, घुमट हे दुरून पाहताना मशिदीचा भास होतो. पूर्वी ज्यावेळी मुसलमान आक्रमकांची दहशत होती. त्यावेळी त्यापासून बचाव करण्यासाठी अशी फसवी रचना केली असावी असे वाटते.

याशिवाय या गावाचे वैशिष्टय म्हणजे देश-विदेशात प्रसिध्द असलेली आगोम ही औषध कंपनी. सूक्ष्म आयुर्वेद तंत्राने अनेक रोगांवर उपायकारक अशी औषधे येथे बववली जातात. कोळथरे सारख्या छोट्याशा गावात 50 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या उद्योगाची आवर्जून माहिती घ्यावी. महाजन कुटुबीय तत्परतेने आपले आगतस्वागत करण्यास उत्सुक आहेत. 

 

      © Ketki Beach Resort. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions