Tourist Attractions

   
मुरूड
  

आसूद पूलापाशी डावीकडे वळून आपण थेट मुरूड गावात पोहोचतो. (अलिबाग जवळिल मुरूड-जंजिरा यांच्याशी याची गल्लत करू नये. दोन्हीही मुरूड वेगळे आणि एकमेकांपासून 100 कि.मी. अंतरावर आहे.) दापोलीतील मुरूड हे भारत रत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मूळ गाव. त्यांचे बालपण याच गावात गेले. गावात प्रवेश केल्यावर चौकातच उजव्या हाताला त्याचा अर्ध पुतळा दिसतो.

समोर दिसणा-या दुर्गादेवी मंदीराच्या डावीकडचा रस्ता आपल्याला थेट समुद्रकिनारी घेवून जातो. अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित अशा या किना-यावरुन उजव्या बाजूस सुवर्ण दुर्ग, कनक दुर्ग, हनेंचा दिपस्तंभ दृष्टीस पडतो. ओहोटीच्या वेळी चालत ही तेथे जाता येते. या गावाची रचना आखीव-रेखीव आहे. संपूर्ण गांवात अतिशय स्वच्छता आढळते. गांवाच्या गल्ली-बोळातून निवांत फेरफटका मारताना कोकणच्या खास जीवन पध्दतीचे, घरांचे निरीक्षण करता येते. गांवात घरगुती तर समुद्रकिनारी नारळी-कोफळीच्या सावलीत अनेक रिसोर्टस् आहेत. उत्कृष्ट भोजन आणि किना-या लगतची सुंदर रचना यांमुळे मुरूड ची रिसोर्टस् लोकप्रिय आहेत.

दुर्गादेवी मंदिर

मुरूड गावात शिरणारा मुख्य रस्ता या मंदिरापाशी थांबतो. पेशवेकालीन बांधणीचे हे दुर्गादेवीचे प्राचीन मंदिर असून देवीचे स्थान स्वयंभू आहे, असे मानतात. मंदिराच्या पुढयात दोन मजली नगार खाना व दगडी दीपमाळ आहे. पाठीमागे खोदलेला तलाव आहे. मंदीराच्या पाय-यांपाशी डावीकडे वरच्या बाजूस एक भली मोठी पितळी घंटा नजरेस पडते. चिमाजी अप्पांनी वसई जिंकलयानंतर तेथील चर्च मधील काही पोर्तुगीज घंटा इकडे आणून मंदिरांना अर्पण केल्या आहे, त्यापैकी ही एक. त्याच्या बाहेरील बाजूवरचा पोर्तुगीज भाषेतील मजकूर स्पष्ट दिसतो.
मंदिराच्या आतिल भागात लाकडी खांबावर केलेले अप्रतिम नक्षीकाम आवर्जून पाहण्यासारखे आहे. त्यातील एका स्तंभ शिरावर एक नागाकृती कोरलेली आहे. नवरात्रात तेथे दुर्गादेवीच्या उत्सवात मोठी जत्रा भरते.

तळयातला गणपती

या गांवातील तळयात एक गणपतीचे स्थान आहे. पावसाळयात तलाव पूर्ण भरला की ही मूर्ती पाण्याखाली जाते. उन्हाळयात मात्र पाणी अटल्यावर भाविकांना दर्शन घेता येते.

महर्षी स्मृती स्मारक

मुरूड गावातच महर्षी स्मृती स्मारक नुकतेच उभारण्यात आले आहे. 1891 साली महर्षी कर्वे यांच्या पुनर्विविहाचा योग ज्या वझे कुटुंबियांनी जुळवून आणला त्याच कुटुबातल्या विद्यमान पिढीने स्वत:च्या खाजगी जागेत हे कार्य स्वप्रेरणेने केले आहे. या ठिकाणी महर्षी कर्वे यांच्या दैनंदिन वापरातील वस्त, जगभरातील नामवंतांबराबरची त्यांची दुर्मिळ छायाचित्रे आणि त्यांचा पुतळा याद्वारे जीवनचित्रसंग्रहालयाची मांडणी करून त्यांना आदरांजली वाहिली बाहे. स्त्रीला समाजात स्थापना प्राप्त करून देणा-या महर्षी कर्वे यांच्या या स्मारकाला भेट देऊन वंदन करणे ही गोष्ट प्रत्येकाने आवर्जून करावी. त्यांच्या जीवनकार्याची ओळख आणि जीवनपट सांगणारी माहितीही त्या ठिकाणी लावण्यात आली आहे. प्रवेश सर्वांना खुला व विनामूल्य आहे. 

 

      © Ketki Beach Resort. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions