Tourist Attractions

   
पन्हाळेकाजी - लेणी
  

दापोली-दाभोळ रस्त्यावर सुमारे पाच किमी. वर नानटे गावाजवळ डावीकडे पन्हाळेकाजीचा फाटा फुटतो. गावापर्यंत थेट गाडी जाते. तेथे कोटजाई नदीच्या काठाने असलेल्या डोंगरामध्ये एकूण 29 गुहा खोदलेल्या आढळतात. इंग्रजी एस आकाराच्या नागमोडी वळणाचे नदीचे पात्र असून दोन्ही बाजूंस डोंगर व हिरवीगार झाडी यामुळे हा परिसर अत्यंत रम्य दिसतो. यातील 28 गुहा उत्तराभिमुख असून 29 वे लेणे थोडे पुढे असलेल्या मठवली येथे असून ते गौरलेणे या नावाने ओळखले जाते. हीनयान बौध्द पंथ, तांत्रिक वज्रयान पंथ आणि नाथ पंथातील प्रतिमांबरोबरच गणपती, लक्ष्मी, सरस्वती, शिवलिंग इ. देवतांच्या मूर्तीही आढळतात. हे येथील वैशिष्टय आहे. हा लेणीसमुह खोदण्याची सुरूवात दुस-या किंवा तिस-या शतकापासून झाली. त्यावेळी हीनयान बौध्द नंथ अस्तित्वात होता. त्यापुढील काळात म्हणजे सुमारे 8 व्या ते 11 व्या शतकांपर्यंत खोदल्या गेलेल्या लेण्यात तांत्रिक वज्रयान पंथीयांचे वर्चस्व होते. याचा पुरावा सापडतो. याच काळात काही मुळाच्या हीनयान लेण्यांत तांत्रिक पूजाविधीसाठी उपयुक्त असे फेरफार केले गेले. तसेच काही नवीन तांत्रिक देवतांची स्थापना करण्यात आली. 11 व्या शतकानंतर शिलाहार राजा अपरादित्य (इ.स.1127 ते 1148) याने कदम्बांकडून या परिसरातील राज्या मिळवले व आपला पुत्र विक्रमादित्य याला दक्षिण कोकण प्रांतांचा अधिपती बनविले. येथील डोंगरावर प्रणालक दुर्ग नावाचा किल्ला होता. या ठिकाणी विक्रमादित्यांची राजधानी होती. त्याचे अवशेष, खुणा आजही दिसतात.

ही प्राचीन लेणी 1970 च्या सुमारास उजेडात आली. त्याचे श्रेय दाभोळचे इतिहासप्रेमी श्री. अण्णा शिरगावकरांना जाते. त्यांना पन्हाळेकाजी गावात एक प्राचीन ताम्रपट सापडला. त्याचे वाचन करून घेऊन त्या अनुषंगाने अनेकांच्या सहकार्याने त्यांनी हे स्थान शोधून काढले. हे ठिकाण आता पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असून तेथे एक रक्षकही नेमलेला आहे. तथापि लेण्यांचा इतिहास, माहिती सांगणारे कोणतेही साधन उपलब्ध नाही. या ठिकाणी दिलेली साधारण माहिती डॉ. एन.एम.देशपांडे यांच्या लेखातील संदर्भाने दिली आहे.

या लेणी समूहातील 4-5-6-7-8-9 क्रमांकाच्या गुहा मिळून जो गट तयार होतो. तो सर्वांत जुना म्हणजे हीनयान बौध्द नंथीय लेणीसमूह होय. त्याच्या पूर्वेस 1-2-3 व पश्चिमेस 10-11-12-13 हे वज्रयान पंथीय तर 14 व्या लेण्यात नाथपंथीय शिल्प, भिंतीवर नाथसिध्दांची शिल्पे कोरली आहे. 15 क्रमांकाचे लेणे मूळ वज्रयान व नंतर गाणपत्यपूजन यासाठी वापरले असावे असे वाटते. तेथे 5 फूट उंचीचे गणपतीचे शिल्प दगडात कोरलेले आहे. अक्षोप्याची, ध्यानस्थ बुध्द अशा प्रतिमा अनेक लेण्यांमध्ये आहेत. यामध्ये शिवलिंग, छतावर कमळाचे अलंकरण, बाजूच्या भिंतीवर रामायण, महाभारत, कृष्णलीला इत्यादी प्रसंगाची शिल्पे आहेत. याशिवाय इतर लेण्यांमध्ये विशेष कोरीवकाम आढळत नाही.

पन्हाळेकाजी गावात चहा-नाष्ट्याची माफक सोय आहे. संपूर्ण लेणी नीट पाहण्यास दीड-दोन तास तरी हवेत. अतिशय शांत, रमणीय असे हे प्राचीन स्थान आपल्या गत हजार वर्षांच्या कला-संस्कृतीच्या, खुणांनी साद घालत आहे. 

 

      © Ketki Beach Resort. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions