Tourist Attractions

   
सडवे - विष्णूमंदिर
  

शिर्दे गावातून मुख्य रस्त्यावर येऊन त्याच मार्गाने पुढे सडवली, कोळबांद्रे मार्गे सडवे किंवा दापोली-खेड रस्त्यावरून वाकवली येथे उजवीकडे वळून गावतळे मार्गेही थेट डांबरी सडकेने सडवे गावात जाता येते. गावातच मुख्य रस्त्यापासून ग्रामपंचायतीच्या शाळेसमोरच्या कच्च्या रस्त्याने खाली उतरावे. खालच्या बाजूस ओढयाच्या काठी गर्द झाडीत विष्णुमंदिर दिसते. मंदिराच्या चारीबाजूंनी दगडी तट असून त्यात दोन प्रवेशद्वारे आहेत. आता मूळ मंदिराच्या जागी नवीन मंदिर उभारले गेले आहे. येथे जांभ्या दगडातील दीपमाळही आहे.

येथील श्री विष्णूची सुमारे चार फूट उंचीची काळया पाषाणातील प्राचीन मूर्ती आहे. सालकृंत अशा या मूर्तीवरील कोरीव नक्षीकाम पाहाण्यासारखे आहे. प्रभावळीवरही नक्षीकाम असून त्यावर दशवतार कोरलेले आहेत. शेजारी एक फूट उंचीच्या गरूडाची दगड मूर्ती आहे. मूर्तीच्या पाययाशी आडव्या पट्टयावर देवनागरी लिपीतील संस्कृत भाषेतील एक शिलालेख कोरलेला आहे. तो मूळ मजकूर स्पष्टपणे वाचता येतो. त्याचा अर्थ विष्णूची मूर्ती सुवर्णकार (मूर्तीकार) कामदेवाने केली. उत्तर शिलाहार राजा द्वितीय केशीराज याचा मांडलिक जैत्र सामंत यांचा प्रधान देवूगीनायक याने शके 1127 (इ.स.1205) सोमवार, रोहिणी नक्षत्र या दिवशी मूर्तीची स्थापना केली. कुतूहल म्हणून आपण तो देवनागरी लिपीतील मूळ मजकूर वाचण्याचा प्रयत्न करावा. चार-दोन अक्षरे जरी लागली तरी एक वेगळाच आनंद मिळतो.

कला व शिल्पप्रेमींनी थोड्याशा आडबाजूला असलेले हे 800 वर्षांपूर्वीचे देखणे शिल्प आवर्जून पाहावे. प्रत्यक्ष मूर्तीच्या दर्शनाने केलेल्या श्रमांचे सार्थक होते. 

 

      © Ketki Beach Resort. Best viewed in 1024 X 768. Developed by Softkey Solutions